IND vs SL, 3rd ODI : कोलंबोच्या प्रेमादास स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे खेळला गेला. श्रीलंकेने तीन विकटने सामना जिंकला आहे. सलग दोन पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाने  शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे.  सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. पावसामुळे सामना प्रत्येकी 47 ओव्हरचा करण्यात आला. भारताने श्रीलंकेला 225 धावांचे आव्हान दिले होते.  39  षटकात श्रीलंकेने  सात गडी गमावत हे लक्ष्य गाठले.


त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी उतलेल्या टीम इंडियाला अवघ्या 225 धावाच करता आल्या. पावसामुळे आजचा सामना 47 षटकांचा खेळला गेला. मात्र टीम इंडिया 47 षटकेही खेळू शकली नाही आणि संपूर्ण भारतीय संघ 43.1 षटकांत तंबूत परतला. पृथ्वी शॉने भारताकडून सर्वाधिक 49 धावांचे योगदान दिले. संजू सॅमसनने पदार्पण सामन्यात 46 धावा केल्या. डेब्यू सामना खेळणार्‍या नितीश राणाने आपली छाप पाडू शकला नाही. राणाला केवळ 7 धावाच करता आल्या.  श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने 3 आणि प्रवीण जय विक्रमने 3 गडी बाद केले.


टीम इंडियाच्या नावे अनोखा विक्रम


भारताच्या वनडे इतिहासातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा पाच खेळाडूंनी संघात एकत्र पदार्पण केलं. यापूर्वी डिसेंबर 1980 मध्ये भारताच्या पाच खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. यामध्ये दिलीप जोशी, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांचा समावेश होता. आजच्या सामन्यात संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, राहुल चहर यांनी पदार्पण केले.