सेंच्युरियन, द. आफ्रिका : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सेन्च्युरियन कसोटीत शतक साजरं करून, भारताच्या पहिल्या डावाला आणखी मजबुती दिली. विराटच्या या शतकाच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी उपाहाराला आठ बाद २८७ धावांची मजल मारली.

दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ३३५ धावा केल्या.त्यामुळं या कसोटीत टीम इंडिया अजूनही ५२ धावांनी पिछाडीवर आहे.

दरम्यान, विराट कोहलीनं आज कसोटी कारकीर्दीतलं एकविसावं शतक झळकावलं. त्यानं १९३ चेंडूंमधली नाबाद १४१ धावांची खेळी १४ चौकारांनी सजवली. विराटनं हार्दिक पंड्याच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची आणि रवीचंद्रन अश्विनच्या साथीनं सातव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली.

या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दोन बाद 28अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या विराटनं आदर्श खेळी करुन भारतीय डावाला आकार दिला. त्यानं हे शतक दहा चौकारांनी सजवलं.

विराटच्या शतकापाठोपाठ टीम इंडियाला एक धक्का बसला. हार्दिक पांड्या अवघ्या 15 धावांवर रन आऊट झाला.

सलामीचा लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा लवकर माघारी परतल्यानंतर मुरली विजय आणि विराट कोहलीने टीम इंडियाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात विराट कोहलीने नाबाद 85 धावांचा डोंगर रचला होता. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी साकारली. मुरली विजयने 6 चौकारांसह 46 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव 335 धावांवर गुंडाळला होता. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक 4, तर इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.