रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. रांचीत सुरु असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही दाणादाण उडाली आहे. पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. पण दुसऱ्या डावातंही मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या भेदक आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी लोटांगण घातलं.

दक्षिण आफ्रिकेने कालच्या 2 बाद 9 या धावसंख्येवरुन आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पण झुबेर हमजा या एकमेव फलंदाजाचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 162 धावांत आटोपला. त्यामुळे पाहुण्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. हमजाने एकाकी झुंज देत 62 धावा केल्या. भारताकडून उमेश यादवने तीन तर मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा आणि शाहबाज नदीमने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आफ्रिकेचा संघ पुन्हा मैदानात उतरला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा आफ्रिकन संघाची दाणादाण उडवली. दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या संघाने 132 धावांच्या बदल्यात 8 गडी गमावले आहेत. त्यामुळे उद्या लवकरात लवकर आफ्रिकेचे उरलेले दोन फलंदाज बाद करुन मालिकेत तिसरा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेच्या फलंदाजांना मोहम्मद शमी आणि उमेश यादवने जेरीस आणले होते. शमीने 9 षटकात 10 धावा देत 3 गडी बाद केले तर यादवने 9 षटकात 35 धावा देत 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजा आणि रवी अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.