रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दितलं पहिलं द्विशतक साजर केलं. तर अजिंक्य रहाणेने देखील शतक ठोकत रोहितला साथ दिली. रोहित-रहाणेच्या खेळीच्या जोरावर सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.


रोहित शर्माने 212 धावांची खेळी केली, तर अजिंक्य रहाणेने 115 धावांची खेळी केली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 268 धावांची भागिदारी केली. रोहितने आपल्या द्विशतकी खेळीत 28 चौकार आणि सहा षटकार ठोकले. तर रहाणेने 17 चौकार आणि एक षटकाराने आपली खेळी सजवली.


रोहित शर्माचं या सीरिजमधलं हे तिसरं शतक आहे. सीरिजमध्ये भारतीय फलंदाजांनी तीन द्विशतक झळकावले आहेत. यामध्ये विराट कोहली, मयंक अगरवाल आणि आता रोहितने द्विशतक ठोकलं. रोहितने चार डावांमध्ये 529 धावा केल्या आहेत. रोहितने विशाखापट्टणममध्ये पहिल्या डावात 176 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या. तर रांची कसोटीत रोहितने 212 धावा ठोकल्या.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला भारताचा निर्णय चुकला की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. 40 धावांच्या आत भारताचे वरच्या फळीचे तीन फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. यामध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मयंक अगरवाल यांचा समावेश होता. पहिले तीन फलंदाज बाद झाल्यानंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव सावरला.