IND Vs SA 2nd T20 : आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा टी 20 सामना कटकमध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यात आफ्रिकेनं टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची कमकुवत गोलंदाजी पाहता दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी सात वाजेपासून हा सामना खेळवण्यात येणार आहे.
पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हर्षल पटेलची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली होती. आजच्या सामन्यात हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर अक्षर पटेलच्या जागी युवा रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती, अखेरच्या आठ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तब्बल 110 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळं गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित मानली जात आहे. पॉवरप्लेच्या षटकात भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तर पहिल्या षटकात महागडा ठरणाऱ्या आवेश खान याने अखेरच्या तीन षटकात टिच्चून मारा केला होता. अर्शदीप डेप्थ ओव्हरमध्ये चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.
पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सलामी दिली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
भारताची संभावित प्लेईंग 11 - : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवि बिश्नोई.
दक्षिण आफ्रिका संभावित प्लेईंग 11 - टेंबा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेन्ड्रिक्स, हेन्रिच क्लासन, केशव महाराज, एडिन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, वेन पार्नेल, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज, रासी व्हॅन डर डसन, मार्को यान्सेन.