World Cup 2019 : भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यानचा विश्वचषकातील पहिल्या उपान्त्य सामन्याचा खेळ पावसामुळे दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या (बुधवार, 10 जुलै) दुपारी तीन वाजता उर्वरित खेळ पुढे सुरु होणार आहे. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात न्यूझीलंड फलंदाजी करत असताना 47 व्या षटकात (46.1) पावसामुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी किवी पाच बाद 211 धावांवर खेळत होते. रॉस टेलर 67, तर टॉम लाथम तीन धावांवर खेळत होता.


दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल तेव्हा न्यूझीलंड 46.2 व्या षटकापासून पुढे सुरुवात करेल. या तीन षटकात भारताला कमीत कमी धावा देण्याचं आव्हान असेल.

ब्रिटीश स्थानिक वेळेनुसार उद्या दुपारी दोन वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता) पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली. बुमराहने सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडल्यावर विल्यमसन मैदानात उतरला.

रॉस टेलर आणि विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. विल्यमसनने 67 धावा करत एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला.

पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी भारताने सामन्यावर पकड घेतली होती. मात्र पावसामुळे गणितं बिघडून टीम इंडियाच्या दृष्टीने सामना जिंकणं अधिक आव्हानात्मक ठरु शकतं.

डकवर्थ ल्युईस नियम लागू झाल्यास काय?

40 षटकं- लक्ष्य 223 धावा
35 षटकं- लक्ष्य 209 धावा
30 षटकं- लक्ष्य 192 धावा
25 षटकं- लक्ष्य 172 धावा
20 षटकं- लक्ष्य 148 धावा

उपान्त्य आणि अंतिम फेरीनंतर राखीव दिवस हा सामन्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी नसतो, तर सामना पुढे सुरु ठेवण्यासाठी असतो. जर राखीव दिवशी पण पावसाचं वर्चस्व राहिलं, तर साखळी फेरीत अधिक गुण मिळवणारा संघ (यावेळी भारत) थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

जर अंतिम फेरीतही पावसाने डाव साधला, आणि राखीव दिवशीही खेळ होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद दिलं जातं.