मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचाच म्हणावा लागेल. एकीकडे रिक्षाच्या संपाची टांगती तलवार कालपर्यंत डोक्यावर संघटनांनी संप मागे घेतल्यामुळे टळली, तर दुसरीकडे बेस्टने मोठी भाडेकपात करुन मुंबईकरांना दिलासा दिला. पहिल्या टप्प्याचं भाडं केवळ पाच रुपये करणाऱ्या बेस्टच्या भाडेकपातीचा आजचा पहिला दिवस होता. त्यामुळे एरवी बेस्ट बसची वाट पाहणं जीवावर येत असलं, तरी आज मात्र बेस्ट बस प्रवाशांनी भरुन जात असल्याचं चित्र होतं.


इतर वेळी बसची वाट पाहण्याच्या फंदात न पडता मुकाट्यानं टॅक्सी, रिक्षाला हात कर‌णारे, ओला-उबर बुक करणारे प्रवासी मोठ्या उत्साहाने बेस्टच्या स्टॉपवर रांगेत उभे होते. प्रवाशांइतकाच उत्साह आज बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही होता. पाच रुपये, पाच रुपये... बेस्टचं तिकीट फक्त 5 रुपये, असं ओरडून आणि भोंगा वाजवत बेस्ट कर्मचारी भाडेकपातीची रस्त्यावर, बसस्टॉपवर जाहिरात करत होते. नेहमी भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी-रिक्षावाल्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
मुंबईकरांचा प्रवास आजपासून स्वस्त होणार, 'बेस्ट'चं किमान भाडं पाच रुपये

बेस्टच्या भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी बेस्टला साथ दिली खरी, मात्र ही साथ टिकवायची असेल, तर बेस्टलाही प्रयत्न करणं गरजेचं आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात 3300 बसेस आहेत. यात 450 मिनी/मिडी बसेस येत्या दोन महिन्यांत आणल्या जाणार आहेत. एकही एसी बस सध्या रस्त्यावर नाही. मात्र येत्या काळात मिनी/मिडी एसी बस रस्त्यावर धावू लागतील, असं बेस्टचं नियोजन आहे.

येत्या डिसेंबरपर्यंत बेस्टच्या ताफ्यात 3250 बसेस वाढवण्यात येतील. म्हणजे येत्या वर्षअखेरीस बेस्टच्या ताफ्यात 7000 बसेस असतील. या सुधारणांसाठी महापालिका बेस्टला एकूण 600 कोटींचं अनुदान देत आहे. यापैकी 100 कोटींचा पहिला हफ्ता बेस्टला सुपूर्द झाला आहे.

बेस्टला दिवसाला तीन कोटींचं उत्पन्न मिळतं, मात्र खर्च 6 कोटींचा आहे. वर्षभराचा तोटा 900 कोटींच्या घरात जातो. सध्या अडीच हजार कोटींचं कर्ज डोक्यावर आहे. त्यात संपकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिन्याला 175 कोटी उत्पन्न हवे. मात्र सध्या महिन्याभराचं उत्पन्न 90 कोटींच्या आसपास आहे.

बेस्टला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी बेस्टने उचलेलं भाडेकपातीचं पाऊल धाडसाचंच म्हणावं लागेल. मात्र हे धाडस बेस्टचं वेडं धाडस ठरु नये. त्यासाठी बेस्टच्या कुरकुरत चालणाऱ्या चाकाला प्रशासनाच्या प्रामाणिक इच्छाशक्तीचं वंगण हवं.