INDvsENG : इंग्लंडविरोधातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. ऋषभ पंत, शिखर धवन, हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियानं सर्वबाद 329 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियाला शतकी सलामी दिली. रोहित 37 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या कर्णधार कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. तो 7 धावांवर बाद झाला.
तर धवनने 10 चौकारांसह 67 धावा केल्या. यानंतर मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. या दरम्यान पंतने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या.
हार्दिक आणि पंत या दोघांनी 99 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर हार्दिकनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर हार्दिक बाद झाला. हार्दिकने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलंनतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला.