INDIA vs ENGLAND 2nd Test : टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. आज शेवटच्या दिवशी सामना वाचवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. चौथ्या दिवशी 55 धावांत तीन विकेट्स पडल्यानंतर चेतेश्वर पुजारा (45) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) यांनी चिवट खेळी करत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या सत्रात या दोघांसह रवींद्र जाडेजासुद्धा बाद झाल्याने भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक अवस्थेत आली आहे. आता ऋषभ पंत आणि तळाच्या फलंदाजांवर भारतीय संघांची मदार आहे.  


भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 181 धावा केल्या असून 154 धावांची आघाडी आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता. टीम इंडियाकडून पहिल्या डावातील शतकवीर के . एल. राहुल केवळ पाच धावा करत बाद झाला तर रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाला.  


भारतीय कर्णधार विराट कोहली देखील 20 धावांवर बाद झाल्यानं टीम इंडिया अडचणीत सापडली.   त्यानंतर पुजारा आणि रहाणे यांनी दुसरे सत्र संयमी खेळी करत सावरले. दोघांनी 100 धावांची पार्टनरशीप केली. मार्क वूडनं पुजाराला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर  रहाणे 61 धावांवर तर जाडेजा केवळ 3 धावा करुन बाद झाले. मार्क वूडने तीन तर मोईन अलीने दोन विकेट्स घेतल्या आहेत. 


टीम इंडियानं पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. केएल राहुलचं शानदार शतक आणि रोहित शर्माचं अर्धशतक तसेच विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाच्या चांगल्या खेळीच्या बळावर भारतानं 364 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून अॅंडरसननं पाच तर मार्क वूड, रॉबिन्सननं दोन दोन विकेट्स घेतल्या होत्या. 


तर इंग्लंडनं पहिल्या डावात कर्णधार ज्यो रुटच्या शानदार नाबाद 180 धावांच्या बळावर 391 धावा करत टीम इंडियावर 27 धावांची आघाडी घेतली होती. बेअरस्टोनं पहिल्या डावात 57 तर बर्न्सनं 49 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात टीम इंडियाकडून सिराजनं चार, इशांत शर्मानं तीन तर शामीनं दोन विकेट्स घेतल्या होत्या.