BCCI announces the squad for World Test Championship: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी आणि इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे.  बीसीसीआयनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.  


भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश केलेला नाही. पृथ्वी शॉनं  विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. निवडकर्त्यांनी चार सलामीवीर फलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे. केएल राहुलची नुकतीच अपेंडिक्स सर्जरी झाली आहे. तो दौऱ्याआधी फिट झाला तर त्याला संघात स्थान मिळू शकेल.  


मध्यक्रमात चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती दिली आहे. राहुलसारखंच वृद्धिमान साहा देखील फिटनेस क्लियरंस द्यावं लागणार आहे.  साहा मागील मंगळवारी कोविड-19 संक्रमित झाला होता. तो दौऱ्याआधी फिट असेल त्याला संघात जागा मिळू शकेल. 






रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा स्पिन गोलंदाजी कमान संभाळतील. सोबतच अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर यांचाही समावेश केला आहे. तर कुलदीप यादवला संघात जागा मिळू शकलेली नाही. 


वेगवान गोलंदाजांची तगडी फौज संघात आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा संघात समावेश आहे सोबतच अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला आणि आवेश खान या चार खेळाडूंचा स्टॅंडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे.


भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.


केएल राहुल आणि साहा (विकेटकीपर) यांना फिटनेस क्लियरंस पास करावं लागेल


स्टँडबाय खेळाडू: अभिमन्यु ईस्वरवान, प्रसिध्द कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला


18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 
18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. भारतीय टीम न्यूझीलंडविरोधात हा सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.  टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वात आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.