नवी दिल्ली : सौम्या सरकार आणि मुशफिकुर रहीमच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने दिल्लीच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियावर सात विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला. बांगलादेशचा टी ट्वेन्टीतला भारताविरुद्धचा हा आजवरचा पहिला विजय ठरला. या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशसमोर 149 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं 3 चेंडू आणि सात विकेट्स राखून हे आव्हान पार केलं. सौम्या सरकार आणि रहीमनं तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सौम्या सरकारने 39 तर रहीमनं नाबाद 60 धावांची खेळी उभारली. या विजयामुळे बांगलादेशने तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


त्याआधी बांगलादेशच्या अचूक माऱ्यासमोर टीम इंडियाला 20 षटकांत सहा बाद 148 धावांची मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवननं लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरच्या साथीनं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. धवनने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शफिउल आणि अमिनुल इस्लामने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


रोहित शर्माचा भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा विक्रम


रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याचा विक्रम रचला. दिल्लीतील बांगलादेशविरुद्धचा टी ट्वेन्टी सामना हा रोहितच्या कारकीर्दीतला 99 वा सामना ठरला. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीने आजवर 98 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर सुरेश रैना 78 आणि विराट कोहलीने 72 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.


भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज खेळवण्यात येत असलेल्या आजच्या सामन्याला एक खास महत्व आहे. कारण उभय संघातला हा सामना पुरुषांच्या ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक हजारावा सामना आहे. 17 फेब्रुवारी 2005 साली पुरुषांच्या टी ट्वेन्टी क्रिकेटमधला पहिला सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या 14 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 999 सामने खेळवण्यात आले आहेत.