मुंबई : उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
'महा' चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थिची सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दक्षिणेकडून उत्तरेकडे 'महा' चक्रीवादळ सरकत असून परिणामी येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह लगतच्या परीसरामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 तारखेनंतर पुण्याला पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील 'महा' या चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं दिला आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
दरम्यान पुण्यात संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कात्रज, धनकवडी, सहकार नगर, बिबवेवाडी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने पुणेकर सुखावले होते. मात्र दुपारनंतर शहराच्या दक्षिण पूर्व भागात ढग दाटून आले. त्याचबरोबर सासवड आणि पुरंदर भागातही पाऊस सुरु आहे.