कोलकाता : कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकात्याच्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात आतापर्यंत 68 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने तीन बाद 174 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीचे मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट आणि पुजाराने संघाचा डाव सावरला. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागिदारी केली. पुजाराने 55 धावांची खेळी केली. दिवसअखेरीस विराट 59 तर रहाणे 23 धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या भेदक आक्रमणासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांत आटोपला. गुलाबी चेंडूवर पहिल्यांदाच खेळणाऱ्या बांगलादेशी फलंदाजांचा भारतीय वेगवान माऱ्यासमोर अजिबात टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे केवळ 30.3 षटकांत बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. भारताकडून ईशांत शर्माने 22 धावांत सर्वाधिक 5 फलंदाजांना माघारी धाडले. तर उमेश यादवने 29 धावांत 3 आणि मोहम्मद शमीने 36 धावांत 2 बळी घेतले.

विराटचा आणखी एक विक्रम
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. विराटने सुरु असलेल्या डे-नाईट कसोटीत कर्णधार या नात्याने ५ हजार धावांचा टप्पा पार केला. या कामगिरीसह कसोटी कर्णधार म्हणून पाच हजार धावा करणारा विराट हा भारताचा पहिला तर जगातला सहावा कर्णधार ठरला आहे. विराटने अवघ्या 86 डावात हा टप्पा गाठून सर्वात जलद 5 हजार धावा करणारा कर्णधार होण्याचाही मान मिळवला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 8 हजार 559 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.

वृद्धीमान साहाचे यष्टिमागे विकेट्सचे शतक
टीम इंडियाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने ईडन गार्डन्सवर यष्टिमागे विकेट्सचे शतक पूर्ण केले आहे. कसोटीत यष्टिमागे 100 विकेट्स घेणारा साहा हा भारताचा पाचवा यष्टिरक्षक ठरला आहे. ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या मेहमुदुल्लाचा झेल घेत साहाने हा विक्रमी टप्पा पार केला. कसोटीत सर्वाधित विकेट्स घेणाऱ्या भारतीय यष्टिरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी 294 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय सय़्यद किरमाणी, किरण मोरे, नयन मोंगिया या भारतीय यष्टिरक्षकांनी 100 पेक्षा जास्त फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

शेख हसीना, ममता बॅनर्जींच्या हस्ते उद्घाटन
ईडन गार्डन्सवरच्या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास हजेरी लावली होती. शेख हसीना आणि ममता बॅनर्जी यांच्या हस्ते बेल वाजवून या कसोटीला प्रारंभ झाला. त्याआधी शेख हसीना आणि ममता यांनी दोन्ही संघातील खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे दोघेही उपस्थित होते.