मुंबई : धर्मशाला कसोटीनंतर भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या तोंडावर एकच नाव आहे, ते म्हणजे कुलदीप यादवचं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 22 वर्षांच्या कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पदार्पणातच अनेकांचं मन जिंकलं आहे. मात्र वीटभट्टी व्यावसायिकाच्या लेकाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच रोमहर्षक आहे. भारताच्या 82 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुलदीप यादव हा पहिलाच चायनामन ठरला आहे.

कुलदीप 11 वर्षांचा असतानाची गोष्ट. खरं तर टेबल टेनिसची आवड असतानाही वडिलांच्या आग्रहाखातर तो क्रिकेट अकादमीत गेला. कानपूरमधून आलेल्या कुलदीप यादवच्या वडिलांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. क्रिकेट खेळायचं, तर डावखुरा वेगवान गोलंदाज होण्याची तिचा मनिषा होती. मात्र तिथेही प्रशिक्षक कपिल पांडेंनी त्याला दुसराच सल्ला दिला.

पांडेजींनी कुलदीपचं मन फिरकी गोलंदाजीकडे वळवलं. प्रशिक्षकाचा आदेश शिरसावंद्य मानत त्याने फिरकी गोलंदाजीचे धडे गिरवले. क्रिकेटकडे फक्त टाईमपास म्हणून बघणाऱ्या कुलदीपला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवू असं स्वप्नातही वाटले नसावं.

गुरुमंत्राच्या जोरावर मेहनत घेतल्याने 11 वर्षांनी कुलदीप कसोटी क्रिकेटमधला पहिला भारतीय चायनामन ठरला आहे. भारताला 82 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुलदीप हा पहिलाच चायनामन गोलंदाज गवसला आहे.

चायनामन गोलंदाज म्हणजे काय?

बोटाऐवजी मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवून  टाकणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला चायनामन म्हणतात. सुरवातीला अशी फिरकी 1933 मध्ये वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहायला मिळाली. वेस्ट इंडीजचे डावखुरे गोलंदाज एलिस अचॉन्ग यांनी इंग्लंडचा फलंदाज वॉल्टर रॉबिन्स यांनी त्रिफळा बाद केलं. या अनोख्या चेंडूवर बाद झाल्यानंतर रॉबिन्स यांनी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना काही अपशब्द उच्चारले, त्यामध्ये चायनामन असा शब्दही वापरला गेला. (याचं कारण म्हणजे एलिस हे मूळ चीनचे होते आणि ते वेस्ट इंडीजकडून खेळत होते) तेव्हापासून या शैलीला चायनामन म्हटलं जातं.

भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 300 धावांत आटोपला. पदार्पणाच्या कसोटीत कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 2 तर अश्विन, जाडेजा आणि भुवनेश्वरने प्रत्येक 1  विकेट घेतली.

दुखापतग्रस्त विराट कोहलीऐवजी भारतीय संघात कुलदीप यादवला संधी देण्यात आली. कुलदीप यादवने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

2014 मध्ये यूएईमध्ये खेळवल्या गेलेल्या अंडर 19 विश्वचषकात 6 सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यातील एका हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. अंडर 19 क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

2012 च्या आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता. नेट प्रॅक्टिसमध्ये तर कुलदीपने चक्क सचिन तेंडुलकरचीच विकेट घेतली होती. त्यानंतर तो केकेआरच्या गोटात सहभागी झाला.

संबंधित बातम्या :


अश्विनचा विक्रम, एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणारा क्रिकेटपटू


IndvsAus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत आटोपला


ब्रेट ली म्हणतो ‘जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात’


टीम इंडियासाठी स्वत: कोहली बनला वॉटर बॉय!