बंगळुरु : मॅट रेनशॉ आणि शॉन मार्श यांच्या झुंजार अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाला बंगळुरू कसोटीवर दुसऱ्या दिवशी पकड घेण्याची संधी मिळवून दिली. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवसअखेर सहा बाद 237 धावांची मजल मारली असून, कांगारूंच्या हाताशी 48 धावांची आघाडी झाली आहे.


दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मॅथ्यू वेड 25, तर मिचेल स्टार्क 14 धावांवर खेळत होता. भारताच्या चारही गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी टिच्चून मारा केला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला दिवसभराच्या खेळात सहा विकेट्स गमावून केवळ 197 धावाच जमवल्या. त्यात मॅट रेनशॉ आणि शॉन मार्शच्या झुंजार अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता.

रेनशॉनं 196 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची, तर शॉन मार्शनं 197 चेंडूंत चार चौकारांसह 66 धावांची खेळी उभारली.