बीसीसीआयने जाहिर केलेल्या 12 खेळाडूंमध्ये विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तर मनीष पांडे, श्रेयस अय्यर, उमेश यादव, वाशिंगटन सुंदर या चौघांची पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यासाठी निवड केलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यात भारत या 12 खेळाडूंपैकी 11 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघांमधल्या तीन ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेतला हा पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात येईल. आगामी दोन महिन्यांच्या काळात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे आणि कसोटी मालिकादेखील खेळणार आहे. त्यामुळे ट्वेन्टी 20 सामन्यांच्या निमित्तानं भारताला ऑस्ट्रेलियातलं वातावरण आणि खेळपट्ट्या यांच्याशी जुळवून घेणं सोपं ठरणार आहे. तरी पुढील मालिकेच्या दृष्टिनं ही ट्वेन्टी 20 मालिका महत्वाची ठरणार आहे.