पर्थ  : विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पर्थ कसोटीत पराभवाच्या छायेत आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं आहे. पण कांगारुंनी चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाची पाच बाद 112 अशी दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकायची तर भारतीय संघाला अजूनही 175 धावांची गरज आहे.


चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत नऊ, तर हनुमा विहारी 24 धावांवर खेळत होता. भारताच्या दुसऱ्या डावात पाचही प्रमुख फलंदाजांनी सपशेल निराशा केली. लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. विराट कोहली आणि मुरली विजयलाही मोठी खेळी उभारता आली नाही.

अजिंक्य रहाणेनं केलेली 30 धावांची खेळीही भारताचा पराभव टाळण्यासाठी पुरेशी नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि जोश हेझलवूडनं प्रत्येकी दोन तर मिचेल स्टार्कनं एक विकेट घेतली.

त्याआधी, मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावांत आटोपला. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार टिम पेननं पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं होतं. पण उपाहारानंतर शमीनं आधी पेन आणि मग ख्वाजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठ्या आघाडीपासून रोखलं.


ख्वाजानं पाच चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तर पेननं 37 धावांचं योगदान दिलं. शमीनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं तीन आणि इशांत शर्मानं एक विकेट घेतली.

भारतीय गोलंदाजांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चार बाद 132 धावांवर रोखलं होतं. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कांगारुंचा कर्णधार टिम पेन 8 तर उस्मान ख्वाजा 41 धावांवर खेळत होते. ख्वाजानं पाच चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तर पेननं 37 धावांचं योगदान दिलं. यानंतर एकही खेळाडू तग धरु शकला नाही.

विराट कोहलीच्या शतकानंतरही पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 283 धावांत आटोपला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली होती.