सिडनी :  सिडनी कसोटीत टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यामुळे तिसऱ्या दिवशी चहापानानंतर ऑस्ट्रेलियाची सहा बाद 236 अशी अवस्था झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसनं आठ चौकारांसह 79 धावांची खेळी उभारली. पण हॅरिस वगळता कांगारुंच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावा केल्या होत्या. आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (27) बाद झाला. दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिस 79 धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ शॉन मार्श 8 धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज 38 धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड 20 धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (5) तंबूत परतला. भारताकडून कुलदीप यादवने तीन आणि रविंद्र जाडेजानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियासमोर 622 धावांचा डोंगर उभा केला.  सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

भारताच्या चेतेश्वर पुजाराचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. त्याने 373 चेंडूंचा सामना करताना 193 धावांची बहारदार खेळी केली. त्यात 22 चौकारांचा समावेश होता. पुजारापाठोपाठ रिषभ पंतनेही कसोटी कारकीर्दीतले दुसरे शतक झळकावले. त्याने 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 159 धावांचे योगदान दिले. पंतने रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. जाडेजानेही 107 चेंडूत 81 धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावांची मजल मारली होती.