अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने वाईट सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या बळावर भारताने 9 बाद 250 धावा केल्या. भारताच्या भरवशाच्या फलंदाजांनी ऐन वेळी विकेट गमावल्याने भारताची दिवसभर पडझड होतच राहिली. परंतु पुजाराने मात्र दुसरी बाजू चांगली सांभाळली. त्याने 246 चेंडुत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची सुरेख खेळी केली. पॅट क्युमिन्सने धावचित करत त्याची खेळी संपुष्टात आणली.


दुसऱ्या बाजुला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. स्टार्क, हेजलवूड, क्युमिन्स आणि लायन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. परंतु आजचा दिवस हा पुजाराचाच होता. त्याने केवळ शतक साजरे केले नाही, तर आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली. सकाळी नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय फलंदाजांनी विराटचा निर्णय अक्षरशः चुकिचा ठरवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाची एकवेळ चार बाद 41 अशी दाणादाण उडाली होती. पण पुजाराने रोहित शर्मा, रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. रोहितने 37 तर पंत आणि अश्विनने प्रत्येकी 25 धावांचे योगदान दिले.