पुणे: डावखुरा स्पिनर स्टीव्ह ओ'कीफ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच दिवशी पुण्याच्या पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं आहे. आधी स्टीव्ह ओ'कीफनं 35 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांत गुंडाळला.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात तब्बल 155 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं मॅट रेनशॉ आणि मिचेल मार्शच्या साथीनं ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर चार बाद 143 धावांची मजल मारून दिली. त्यामुळं पुण्याच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 298 धावांची झाली आहे.

ओकीफीने एकाच षटकात तीन विकेट घेत, भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. ओकीफीने 33 व्या षटकात आधी के एल राहुल, मग  अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाला माघारी धाडून, भारताची अवस्था 6 बाद 95 अशी बिकट केली.

त्यानंतर मग नॅथन लायनने अश्विनला आणि ओकीफीने जयंत यादवला माघारी धाडून भारताची अवस्था आणखी वाईट म्हणजे 8 बाद 99 अशी केली. मग जाडेजा आणि उमेश यादव यांनाही ओकीफीनेच माघारी धाडत, भारताचा डाव अवघ्या 105 धावांत गुंडाळला.

आज सकाळी भारतानं ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फलंदाजाला माघारी धाडून कांगारूंचा डाव 260 धावांत आटोपला होता. पण त्यानंतर फिल हेझलवूड, स्टीव्ह ओकीफी आणि मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली.