सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन-डेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी 288 धावांचं आव्हान ठेवलं आहे. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्सकॉम्बच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 5 बाद 288 धावांची मजल मारता आली.


ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरॉन फिंच आणि अॅलेक्स कॅरी ही सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर ख्वाजा आणि मार्शनं ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला.


ख्वाजानं सहा चौकारांसह 59 धावांची खेळी उभारली तर मार्शनं चार चौकारांसह 54 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या पीटर हॅन्ड्सकॉम्बनंही 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत कांगारुंना धावांचा 288 टप्पा गाठून दिला.


भारताकडून कुलदीप यादवनं दोन तर रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


इंग्लंडमधील आगामी विश्वचषक अवघ्या साडेचार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या विश्वचषकाची तयारी करायची तर टीम इंडियाच्या हाताशी आता 13 वन डे आणि पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे.