इंदूर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियाने प्रबळ आत्मविश्वास मिळवताना अफगाणिस्तानची धुळदाण उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. आज (14 जानेवारी) इंदूर येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा विकेटसने पराभव केला. शिवम दुबेनं सलग दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.






या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल सहा सिक्स आणि  पाच चौकार मारले. शिवम दुबेनेही सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यामुळे टीम इंडियाला 173 धावांचे आव्हान सहजपणे पार करता आले. या सामन्यात रोहित शर्माकडून निराशा झाली. तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. 






यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली मैदानात आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह करत इरादा स्पष्ट केला. कोहली 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा करून  बाद झाला. त्याला नावीनने बाद केले. त्याचा एक चौकार वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या हॅरिस रौफला मारलेल्या सिक्सची आठवण करून देणारा होता. किंचित अंतराने तो चौकार ठरला. यानंतर यशस्वी आणि शिवमने मैदानात चौकार आणि षटकारांची बरसात करत विजय आवाक्यात आणला. यशस्वी बाद झाल्यानंतर जितेशही बाद झाला. त्यानंतर विजयाची औपचारिकता शिवम आणि रिंकू सिंहने पूर्ण केली.






तत्पूर्वी, अफगाण फलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढताना 20 षटकांत 172 धावा केल्या.टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. शिवम दुबेने 1 बळी आपल्या नावावर केला. 






इतर महत्वाच्या बातम्या