बर्मिंगहॅम : विश्वचषकात दुखापतीमुळे संघातून बाहेर होणाऱ्या खेळाडूंमध्ये आता विजय शंकरचाही समावेश झाला आहे. पायाच्या अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे तो विश्वचषकात खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी मयांक अगरवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. याआधी शिखर धवनही दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेला होता. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळेच संघातून बाहेर आहे.


सरावादरम्यान दुखापत
सरावादरम्यान विजय शंकरच्या पायाला दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या पायावर आदळला आणि त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता.

शंकर मायदेशी परतणार
याआधी शंकरची दुखापत गंभीर नसून तो संघात कमबॅक करु शकतो, असं म्हटलं जात होतं. परंतु त्याच्या दुखापतीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे यापुढील सामन्यात तो सहभागी होऊ शकत नाही. तो पुन्हा मायदेशी परतत आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

2019 च्या विश्वचषकासाठी निवड समितीने अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांच्याऐवजी विजय शंकरवर विश्वास दाखवला होता.

मयांक अगरवालची चर्चा
कर्नाटक संघाचा सलामीवीर 28 वर्षीय मयांक अगरवालने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तो अद्याप एकदिवसीय सामन्यात खेळलेला नाही.
सलामीवीर असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अगरवालचा टीममध्ये समावेश करु शकतं. तसंच रिषभ पंत पुढच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्यास के एल राहुलला चौथ्या क्रमाकांवर संधी दिली जाऊ शकते.