मुंबई : 'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. मात्र आयसीसीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
आगामी विश्वचषकात टीम इंडियाच्या पर्यायी जर्सीचा रंग निळा आणि भगवा असेल. टीम इंडियाच्या वन डे सामन्यांसाठीच्या पारंपरिक जर्सीचा रंग निळा आहे. त्यातही कॉलरवर आणि पाठीवरच्या नाव-क्रमांकासाठी भगव्या रंगाचा मोजका वापर आहे. पण विश्वचषकातल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडिया पर्यायी म्हणजे निळ्या आणि भगव्या रंगाच्या नव्या जर्सीत खेळणार आहे.
कधी वेगळ्या रंगाची जर्सी घालणार?
भारतासह यजमान इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांची पारंपरिक जर्सीही निळ्या रंगाची आहे. आयसीसीच्या प्रस्तावानुसार, दोन्ही संघांची पारंपरिक जर्सी एकाच रंगातली असल्यास, अवे सामना खेळणारा संघ पर्यायी रंगाच्या जर्सीत दिसेल. याचा सरळ अर्थ असा की, भारतीय संघ जेव्हा इंग्लंड, अफगाणिस्तान खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा खेळाडूंची जर्सी भगव्या रंगाची असेल. तर श्रीलंकेसह इतर देशांविरुद्ध भारतीय संघ आपल्या पारंपरिक निळ्या जर्सीमध्ये दिसेल. तर यजमान इंग्लंड संघाची जर्सी मात्र तिच असेल.
दोन रंगांचा पर्याय
सध्याचा जमाना हा टेलिव्हिजनचा आहे. टेलिव्हिजनवरचं प्रक्षेपण अधिक 'रंगत'दार व्हावं म्हणून आयसीसीने होम आणि अवे अशा दोन जर्सींचा प्रस्ताव ठेवला आहे. आयसीसीसीच्या दफ्तरी टीम इंडियाच्या जर्सी कलरची ब्लू ॲण्ड ऑरेंज अशी आधीपासूनच नोंद आहे. त्यामुळे अवे सामन्यांसाठी बीसीसीआयकडून गडद निळ्या आणि भगव्या रंगाचा पर्याय देण्यात आला आहे.
या तीन संघांनाही जर्सीचा रंग बदलावा लागणार
याशिवाय पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तीन संघांची जर्सी हिरव्या रंगाची आहे. त्यामुळे त्यांनीही काही सामन्यांसाठी वेगळ्या रंगाची जर्सी वापरावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया, विंडीज, न्यूझीलंडची युनिक जर्सी
तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांच्या जर्सीचा रंग युनिक आहे. त्यामुळे त्यांना वेगळ्या रंगाच्या जर्सीची गरज भासणार नाही.