मुंबई : विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल. मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे.


विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याआधी रिषभ पंतचा अंतिम 15 मध्ये समावेश होईल असा दावा केला जात होता. परंतु निवड समितीने पंतऐवजी दिनेश कार्तिकला प्राधान्य दिलं. सूत्रांच्या मते, दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश होऊ शकतो.

बॅकअप म्हणू पंत इंग्लंडला
"बॅकअप म्हणून रिषभ पंतला इंग्लंडला बोलवण्यात आलं आहे, जेणेकरुन त्याला इथल्या परिस्थितीचा अंदाज येईल. जर धवन फिट झाला नाही तर आम्ही आयसीसीसमोर ही बाब मांडू आणि मंजुरी मिळाल्यानंतर रिषभला तातडीने टीममध्ये सहभागी करता येईल," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतला टीम इंडियाची जर्सी
रिषभ पंत गुरुवार (13 जून) रात्री नॉटिंग्घमला पोहोचेल. उद्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगणार आहे. शिखर धवन जोपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत रिषभ पंत संघात सामील होणार नाही. रिषभ पंतला दिल्लीतील त्याच्या घरी संघाच्या जर्सीपासून अधिकृत वस्तू देण्यात आलं आहे. पंत संघात सहभागी झाल्यास तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. तर रोहित शर्मासोबत लोकेश राहुल सलामीला उतरु शकतो.

पाकिस्तानविरुद्ध पंत खेळणार!
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंत सामील होऊ शकणार नाही. परंतु पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात रिषभ पंताचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. सूत्रांच्या मते, "राहुल आता रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात करु शकतो आणि पंत चौथ्या क्रमांकवर फलंदाजी करु शकतो. पण हा विचार फारच दूरचा आहे. आम्ही सगळ्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहे."

शिखर धवनला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.