श्रीनगर : क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या विश्वचषकात भारताचा हा पहिला पराभव आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारताच्या पराभवासाठी भगव्या जर्सीला जबाबदार ठरवलं आहे.


विश्वचषकातील टीम इंडियाचा विजयरथ इंग्लंडने रोखला. बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडने भारतावर 31 धावांनी मात करुन, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306 धावांचीच मजल मारता आली.

या सामन्यानंतर भारताच्या पराभवानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता, पण या जर्सीनेच विश्वचषकातील भारताची विजयी घोडदौड रोखली.


उमर अब्दुल्ला यांचाही सवाल
तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही ट्वीट करुन भारताच्या पराभवावर प्रश्न उपस्थित केला आहे. "पाकिस्तान आणि इंग्लंडच्या जागी जर आपलं सेमीफायनलचं तिकीट पणाला लागलं असतं, तेव्हाही टीम इंडियाने अशीच फलंदाजी केली असती का?


अबू आझमींचा विरोध
दरम्यान, सपा नेते अबू आझमी यांनीही टीम इंडियाच्या भगव्या जर्सीला विरोध केला होता. ऑरेंज जर्सीमुळे भगवीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय जर्सीमध्ये भगवा रंग देऊ शकता, मग हिरवा का नाही? असा सवालही त्यांनी विचारला होता. भारतीय संघांच्या जर्सीला तिरंग्यातील रंग दिले असते काही हरकत नव्हती. मात्र प्रत्येक गोष्टीत भगवीकरण होत आहे, ते योग्य नाही. देशातील जनतेने याचा विरोध करायला हवा, असं अबू आझमी म्हणाले होते.


...म्हणून जर्सीचा रंग बदलला
भारतासह अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघाच्या जर्सीचा रंगही निळा आहे. आयसीसीच्या नियमानुसार टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ एकाच रंगाची जर्सी घालून मैदानात उतरु शकत नाही. हा नियम फुटबॉलच्या 'होम आणि अवे' सामन्यात परिधान केल्या जाणाऱ्या जर्सीच्या धर्तीवर बनवण्यात आला आहे.

इंग्लंडने भारताचा विजयरथ रोखला
बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 306 धावांवर आटोपला. परिणामी भारताने हा सामना 31 धावांनी गमावला. मात्र या विजयामुळे इंग्लंडच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अजूनही शाबूत आहेत. या सामन्यात भारतीय संघ भगव्या आणि निळ्या रंगाची जर्सी परिधान करुन मैदानात उतरला होता.

रोहित शर्माने झळकावलेलं शतक भारताच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ती जोडी फुटली आणि टीम इंडिया विजयापासून दूर राहिली.