मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातील दुसरा सामना आज पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात भारतीय महिलांचं पारडं जड मानलं जात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
भारतीय महिलांनी शुक्रवारी न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव करून, ट्वेन्टी ट्वेन्टीत आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. या सामन्यात हरमनप्रीतनं अवघ्या 51 चेंडूंत 103 धावांची, तर जेमिमा रॉड्रिग्सनं 45 चेंडूंत 59 धावांची खेळी उभारली.
त्यामुळे भारतीय संघानं न्यूझीलंडला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. मग हेमलता, पूनम यादव आणि राधा यादवनं न्यूझीलंडला 160 धावांत गुंडाळलं. भारतीय महिला संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 52 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
9 नोव्हेंबरपासून महिला टी20 विश्वचषक, पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारतीय महिलांचा टी 20 विश्वचषकातील प्रवास...
सलामीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला. आज भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. त्यानंतर 15 नोव्हेंबरला आयर्लंडविरुद्ध तर 17 नोव्हेंबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघ दोन हात करेल.
ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारतीय महिला संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. गेल्या पाच विश्वचषकांत तीन वेळा ऑस्ट्रेलियाने तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ नवा इतिहास घडवणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.