मितालीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2017 07:17 PM (IST)
लंडन : मिताली राजच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात कर्णधार मिताली राजच्या खणखणीत शतकाच्या जोरावर, भारतीय महिलांनी न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. राजेश्वरी गायकवाडनं 15 धावांत पाच विकेट्स काढून न्यूझीलंडचा अख्खा डाव 79 धावांत गुंडाळला. या सामन्यात मिताली राजनं वैयक्तिक शतक झळकावलंच, पण हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्तीच्या साथीनं शतकी भागीदाऱ्याही रचल्या. त्यामुळेच भारतीय महिलांना 50 षटकांत सात बाद 265 धावांची मजल मारता आली. मितालीनं 123 चेंडूंत अकरा चौकारांसह 109 धावांची खेळी उभारली. हरमनप्रीत कौरनं सात चौकारांसह 60 धावा, तर वेदा कृष्णमूर्तीनं सात चौकार आणि दोन षटकारांसह 70 धावांची खेळी केली.