लंडन : मिताली राजच्या भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर नऊ धावांनी अधुरं राहिलं. लॉर्डसवरच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडनं भारतावर मात करून चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.


या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. पण एक खिंड लावून धरणारी पूनम राऊत बाद झाली आणि भारताचा अख्खा डाव 219 धावांत आटोपला.

भारताकडून पूनम राऊतनं 115 चेंडूंत 86 धावांची मोलाची खेळी उभारली. हरमनप्रीत कौरनं 51 धावांची, तर वेदा कृष्णमूर्तीनं 35 धावांची खेळी करून भारताच्या विजयासाठी शिकस्त केली.

त्याआधी फायनलच्या या लढाईत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 50 षटकांत सात बाद 228 धावांत रोखलं.

इंग्लंडच्या लॉरेन विनफिल्ड आणि टॅमी ब्युमॉन्टनं 47 धावांची सलामी दिली, तर सारा टेलर आणि नताली सिव्हरनं चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. पण झुलान गोस्वामीनं तीन, तर पूनम यादवनं दोन विकेट्स काढून इंग्लंडला रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली.