मुंबई : 2019 सालच्या वन डे सामन्यांच्या विश्वचषकासाठी थेट पात्र न ठरण्याचा पाकिस्तानसमोरचा धोका अजूनही टळलेला नाही. पहिल्या सात क्रमांकात स्थान न मिळाल्याने पाकिस्तानसाठी धागधूग कायम आहे.


आयसीसीची वन डे सामन्यांसाठीची क्रमवारी शुक्रवारी जाहीर झाली. त्यामध्ये पाकिस्तान 89 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या खात्यात सातव्या स्थानावरच्या बांगलादेशपेक्षा दोन गुण कमी तर, नवव्या स्थानावरच्या वेस्ट इंडिजपेक्षा दोनच गुण जास्त आहेत.

आयसीसीच्या नियमानुसार आगामी विश्वचषकाचा यजमान इंग्लंड वगळता 30 सप्टेंबर 2017 या दिवशी आयसीसी क्रमवारीत पहिल्या सात स्थानांवर असलेले संघच या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आयसीसीच्या वन डे क्रमवारीतलं आपलं स्थान सुधारण्यासाठी पाकिस्तानला येत्या आठ महिन्यांमध्ये बांगलादेश आणि वेस्ट इंडिजशी खेळण्याची संधी मिळणार आहे.