लंडन : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आज (शुक्रवारी) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 94 धावांनी मात करुन, विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात पाचवा विजय साजरा केला. या विजयाने पाकिस्तानला गुणतालिकेत न्यूझीलंडसोबत 11-11 गुणांची बरोबरीही साधून दिली. परंतु या सामन्यात नेट रनरेटचं समीकरण राखण्यात अपयश आल्याने पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.


पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी या सामन्यात बांगलादेशला अवघ्या सहा धावांमध्ये रोखणे आवश्यक होते. परंतु बांगलादेशने सहा धावांचा टप्पा सहज ओलांडून 221 धावांची मजल मारली. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याआधी पाकिस्ताननं 50 षटकांत नऊ बाद 315 धावांची मजल मारली होती.

पाकिस्तानने दिलेल्या 316 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला केवळ 221 धावांपर्यंतच मजल मारली. बांग्लादेशच्या शकीब अल हसनने (77 चेंडूत 66 धावा) काही काळ सामन्यात बांगलादेशला जीवंत ठेवले होते. परंतु त्याला मोठी खेळी उभारता आली नाही. हसन व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला पाकिस्तानी गोलंदाजांनी फार वेळ मैदानात टिकू दिले नाही. त्यामुळे हा सामना पाकिस्तानने सहज जिंकला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 9.1 षटकात 35 धावांच्या बदल्यात 6 बळी मिळवले. तर शादाब खानने 2 बळी मिळवले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा सलामीवीर फाखर जमान ( 13) स्वस्तात माघारी परतला. परंतु त्यानंतर इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. बाबरने 98 चेंडूंत 96 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 474 धावा केल्या आहेत. इमामने (100 चेंडूत 100) शतकी खेळी केली. त्यानंतर इमाम वासीमने 26 चेंडूत 43 धावांची खेळी करत पाकिस्तानला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

गुणतालिका