लंडन : सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. मंगळवारी झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटरसिक चिंतेत आहेत.


मंगळवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. या लढतीत रोहित शर्माचे शतक तर लोकेश राहुलने 77 धावांची खेळी करून संघाला 180 धावांची सलामी दिली. त्यानंतर ऋषभ पंतने 48 धावांची आक्रमक खेळी करुन दिली. त्यामुळे भारतीय संघ 350 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. परंतु अखेरच्या षटकात धोनी पुन्हा एकदा संथ खेळला. त्यामुळे भारताला मोठी धावसख्या उभारता आली नाही.

धोनीच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शनावर त्याचे चाहतेदेखील नाराज आहेत. धोनी पूर्वीसारखा खेळत नसल्यामुळे त्याच्या टीकाकारांनादेखील त्याच्याविरोधात बोलण्याची आयती संधी मिळाली आहे. "धोनी त्याच्या लौकीकाप्रमाणे खेळत नाही, धोनी खूप धिम्या गतीने खेळू लागला आहे, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळतोय," अशी टीका त्याच्यावर सुरु आहे. तर अनेकांनी धोनीला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

धोनीच्या निवृत्तीबद्दल सर्वत्र चर्चा सुरु असताना श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा मात्र धोनीच्या पाठीशी उभा राहिला आहे. लसिथ मलिंगा स्वतः या वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. वर्ल्डकपमधील भारताविरुद्धचा सामना हा लसिथ मलिंगाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना ठरेल. तर दुसऱ्या बाजूला धोनीदेखील या वर्ल्डकपमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मलिंगाला विचारले असता तो म्हणाला की, धोनीने आत्ता निवृत्ती घेऊ नये.

मलिंगा म्हणाला की, भारतीय संघात सध्या नवनव्या खेळाडूंचा प्रवेश होत आहे. सध्या त्यांच्या संघात धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. धोनीने निवृत्त होण्यापूर्वी या नव्या दमाच्या खेळाडूंसोबत काही काळ खेळायला हवे. पुढील एक-दोन वर्षात संघातील नव्या खेळाडूंना परिपक्व करुनच निवृत्ती घ्यावी.

व्हिडीओ पाहा : विश्वचषकानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार? | एबीपी माझा



धोनीची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका – 34 धावा (46 चेंडू)
ऑस्ट्रेलिया – 27 धावा (14 चेंडू)
पाकिस्तान – 1 धाव (2 चेंडू)
अफगाणिस्तान – 28 धावा (52 चेंडू)
वेस्ट इंडीज – नाबाद 56 धावा (61 चेंडू)
इंग्लंड – नाबाद 46 धावा (31 चेंडू)
बांग्लादेश – 35 धावा (33 चेंडू)

काश्मीरमध्ये महेंद्र सिंह धोनीसमोर आफ्रिदीच्या नावाची घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल



वाचा : धोनीच्या अखेरच्या सामन्याविषयी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचं भाकित