बंगळूर : न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सन जायबंदी असल्याने संधी मिळालेल्या रचिन रविंद्रने न्यूझीलंडसाठी वर्ल्डकपमध्ये अक्षरशः धुवाँधार कामगिरी केली आहे. त्याने आज वर्ल्डकपमधील आपल्या तिसऱ्या शतकाची नोंद केली. पाकिस्तानविरुद्ध बंगळूरमध्ये त्याने तिसऱ्या शतकाची नोंद करत न्यूझीलंडला भक्कम धावसंख्या उभारून दिली. 


या खेळीमुळे रचिनने थेट क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वयाची 24 सुद्धा पार न केलेल्या रचिन रविंद्रने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये तीन शतके झळकावून थेट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकरच्या नावे वयाच्या चोविशीत दोन शतकांची नोंद आहे. 






त्यामुळे रचिन न्यूझीलंडसाठी या वर्ल्डकप स्पर्धेत गवसलेला हिराच आहे, असं म्हणावं लागेल. अनिवासी भारतीय असलेल्या रचिनने 2019 मध्ये याच बंगळूरमध्ये बसून न्यूझीलंड आणि इंग्लंडची फायनल मॅच पाहिली होती आणि आज तोच खेळाडू न्यूझीलंडसाठी शतकांची बरसात करत आहे. यावरून या खेळाडूची गुणवत्ता दिसून येते.






वर्ल्डकपच्या पदार्पणामध्ये तीन शतके झळकवणारा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसाच तो न्यूझीलंडसाठी सुद्धा पहिला खेळाडू ठरला. त्यामुळे न्यूझीलंडसाठी पुढील काही वर्षांसाठी नव्हे तर दशकासाठी हा खेळाडू अधिराज्य गाजवत राहील यामध्ये शंका नाही. दुसरीकडे, दुखापतीमधून पुनरागमन करत असलेल्या न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनने सुद्धा दमदार खेळी केली. तो 95 धावा करून बाद झाला.  






दुसरीकडे, उपांत्य फेरी गाठण्यासाठी या दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मोठ्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दुखापतग्रस्त असतानाही जबाबदारी स्वीकारली. त्याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी केल्यानंतर केन विल्यमसन विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या अनेक माजी दिग्गजांना मागे सोडले आहे.






तो विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीव्हन फ्लेमिंगचे नाव या यादीत सामील होते, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 33 विश्वचषक डावांमध्ये 1075 धावा केल्या होत्या. फ्लेमिंगच्या विक्रमाला मागे टाकत केन विल्यमसनने आतापर्यंत विश्वचषकातील 24 डावांमध्ये 1083 धावा केल्या आहेत.


या यादीतील तिसऱ्या खेळाडूचे नाव रॉस टेलर आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने विश्वचषकातील 30 डावांमध्ये एकूण 1002 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर या यादीत मार्टिन गुप्टिलचे नाव सामील झाले आहे, ज्याने विश्वचषकातील 27 डावांत एकूण 975 धावा केल्या. या यादीत न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टारिसचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत विश्वचषकाच्या एकूण 22 डावांमध्ये फलंदाजी केली आणि 909 धावा केल्या.


इतर महत्वाच्या बातम्या