मुंबई : लंडनचे ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट स्टेडियम पाचव्यांदा (1975, 1979, 1983, 1999 आणि आता 2019) विश्वचषक विजयाचे साक्षीदार ठरणार आहे. ज्या लॉर्ड्सवर क्लाईव्ह लॉइड, कपिल देव आणि स्टीव्ह वॉने विश्वचषक उंचावला त्या पंक्तीत आता कोणाचा समावेश होणार? न्यूझीलंडचा केन विल्यम्सनचा की इंग्लंडच्या ऑइन मॉर्गन?


विश्वचषकाच्या फायनलच्या निमित्ताने न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांची विश्वचषकातली विजेतेपदाची पाटी अद्याप कोरीच आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात क्रिकेटजगताला एक नवा विजेता मिळणार आहे.

2015 च्या विश्वचषकात ब्रॅन्डन मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठली होती. दुर्दैवानं न्यूझीलंडच्या विजेतेपदाच्या त्या स्वप्नावर ऑस्ट्रेलियाने पाणी फेरले. पण स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रॅन्डन मॅक्युलमचा वारसा यशस्वीरित्या चालवणाऱ्या केन विल्यम्सनने न्यूझीलंडला पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.

दुसरीकडे इंग्लंडनं तब्बल 27 वर्षांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. इंग्लंडचा सध्याचा संघ हा सर्व आघाड्यांवर मजबूत मानला जातोय. त्यामुळे विश्वचषकाची अंतिम लढत चुरशीची होईल, यात तीळमात्र शंका नाही.

विश्वचषकाच्या मैदानात न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांमध्ये आजवर नऊ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात पाच सामने न्यूझीलंडने तर चार सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली आहे. या आकडेवारीवरुन न्यूझीलंडचं पारडं जड दिसत असलं तरी यंदाच्या विश्वचषकातल्या साखळी फेरीत इंग्लंडकडून विल्यम्सनच्या फौजेला तब्बल 119 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणूनच फायनलसाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध काय रणनिती आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

2011 आणि 2015 च्या विश्वचषकात यजमान संघांनी विजेतेपदाचा मान मिळवला आहे. 2011 ला भारताने तर 2015 ला ऑस्ट्रेलियाने मायदेशातीस विश्वचषक पटकावला होता. यंदाही यजमान इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन विश्वचषकातला तो योग पुन्हा जुळून येणार की न्यूझीलंड ती परंपरा मोडीत काढणार? याचीच आता उत्सुकता आहे. परंतु न्यूझीलंड जिंको वा इंग्लंड क्रिकेटविश्वाला एक नवा विजेता मिळणार एवढं मात्र नक्की.