नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सध्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. यंदाची ही स्पर्धा कोण जिंकणार याची सर्वांनाच उस्तुकता आहे. इंग्लंड, भारत, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे सर्वच संघ तुल्यबळ आहेत. प्रत्येकाने आपआपली फेव्हरेट टीम निवडली आहे. भारताने यंदाची विश्वचषक स्पर्धा जिंकून तिसऱ्यांदा विश्वचषक मिळवावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. परंतु इतरही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत.

भारताने विश्वचषक जिंकावा अशीच इच्छा मूळचे भारतीय असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचीदेखील असेल. पिचाई यांनी त्याबाबतची एक भविष्यवाणी केली आहे. सुंदर पिचाई म्हणाले की, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि यजमान इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगेल. मला असे वाटते की विराट कोहलीच्या टीम इंडियाने या अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून विश्वचषक जिंकावा. यूएसआईबीसी च्या 'इंडिया आयडियाज समिट'मध्ये पिचाई बोलत होते.

पिचाई म्हणाले की मला वाटते इंग्लंड आणि भारत दोघांमध्ये अंतिम सामना होईल. परंतु ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघदेखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हे दोन संघ ऐनवेळी सर्व चित्र बदलू शकतील.

 न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर विराट कोहली म्हणतो...

वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाच गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे.