लंडन : दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकात आपला दुसरा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यांचा हा आठव्या सामन्यातील दुसराच विजय ठरला.


आजच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या निराशाजनक विश्वचषक मोहिमेला एक दिलासा मिळाला. या सामन्यात हाशिम आमला आणि फाफ ड्यू प्लेसीनं दुसऱ्या विकेटसाठी रचलेली 175 धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक ठरली. आमलानं नाबाद 80, तर ड्यू प्लेसीनं नाबाद 92 धावांची खेळी उभारली.


त्याआधी, दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव 203 धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियस आणि ख्रिस मॉरिसनं श्रीलंकेच्या फलंदाजीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्या दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन फलंदाजांना माघारी धाडलं.


कागिसो रबाडानं दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडोची 30 धावांची खेळी श्रीलंकेच्या डावातली सर्वोच्च खेळी ठरली.