लंडन : इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. हा सामना नऊ जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येईल. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 11 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येईल. या सामन्यात यजमान इंग्लंडचा मुकाबला त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी होईल.


सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा यंदाच्या विश्वचषकातला सातवा विजय ठरला.

सात सामन्यातील विजय (14 गुण) आणि एका रद्द सामन्यामधून मिळालेला 1 गुण मिळून 15 गुणांसह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. तर 5 विजयांसह न्यूझीलंडच्या संघाने 11 गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

दरम्यान नऊ सामन्यांपैकी सात विजयांसह ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या संघाने सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार आहे.