मॅन्चेस्टर : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकांत आठ बाद 239 धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने 46 षटकं आणि एका चेंडूत 5 बाद 211 धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडने आज उर्वरित 23 चेंडूत तीन गडी गमावून फक्त 28 धावांचीच भर घातली.

न्यूझीलंडच्या डावात कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. विल्यमसनने 95 चेंडूत सहा चौकारांसह 67 धावांची, तर टेलरनं 90 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 74 धावांची खेळी उभारली.

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना शेवटपर्यंत जखडून ठेवले होते. अनुभवी भुवनेश्वर कुमारने 10 षटकात 43 धावा देत 3 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने 10 षटकात 39 धावा देऊन 1 गडी बाद केला. रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना खूप कंजुसी दाखवली. त्याने 10 षटकात 34 धावा देत 1 गडी बाद केला.

न्यूझीलंडचे 240 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची खूपच बिकट अवस्था झाली आहे. भारताने 11 षटकांमध्ये 4 गडी गमावले आहेत. सुरुवातीला भारताची अवस्था 3 बाद 5 अशी अवस्था झाली होती. त्यानंतन रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक डाव सावरतील असे वाटत होते. परंतु 25 चेंडूत 6 धावांवर असताना निशमच्या हाती झेल देऊन कार्तिकदेखील पव्हेलियनमध्ये परतला.

सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले आहेत. न्यूझीलंडकडून मार्क हेन्रीने 6 षटकात 18 धावा देत 3 गडी बाद केले. तर ट्रेन्ट बोल्टने 6 षटकात 15 धावा देत एक गडी बाद केला आहे.