लंडन: सरफराज अहमदच्या पाकिस्ताननं टीम इंडियाचा 180 धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.


लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यावर पाकिस्ताननं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं.

त्या लक्ष्याच्या दडपणाखाली टीम इंडियाचा अख्खा डाव अवघ्या 158 धावांत गडगडला.  भारताकडून हार्दिक पंड्यानं 76 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. टीम इंडियाच्या अन्य दहा फलंदाजांनी मिळून केवळ 79 धावाच जमवल्या. 

तोच सरफराज अहमद 

ज्या सरफराज अहमदच्या नेतृत्त्वात पाकिस्तानने टीम इंडियाला हरवलं, त्याच सरफराजच्या टीमने 2006 मध्येही भारतीय संघाला हरवलं होतं.  19 फ्रेबुवारी 2006 रोजी ही फायनल मॅच झाली होती.

अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सरफराजच्या टीमने भारतावर 38 धावांनी विजय मिळवून, विश्वचषकावर नाव कोरलं होतं.  त्यावेळीही सरफराजच पाकिस्तानच्या अंडर 19 संघाचा कर्णधार होता. 

आश्चर्य म्हणजे त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने अवघ्या 109 धावांत रोखलं होतं. मात्र चिवट सरफराजने चाणाक्ष कॅप्टन्सी करुन, त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव केला होता. 

त्यावेळीही सरफराजच्या साथीला इमाद वासिम होता. तोच इमाद वासिम कालच्या सामन्यातही होता.

2006 मधील त्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला अवघ्या 71 धावांतच लोटांगण घालण्यास भाग पाडलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे 2006च्या अंडर 19 भारतीय संघात रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजासोबत चेतेश्वर पुजारा आणि पियूष चावलाही होते. त्यावेळी रवीकांत शुक्ला हा टीम इंडियाचा कर्णधार होता.

या सामन्यात भारताचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. त्यामध्ये सलामीवीर गौरव धिमान आणि चेतेश्वर पुजाराचा समावेश होता.

त्यावेळी रोहित शर्माने 7 चेंडूत 4 धावा, तर जाडेजाने 15 चेंडूत 6 धावा केल्या होत्या. एकट्या पियूष चावलाने सर्वाधिक 25 धावा केल्या होत्या.