लंडन: विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, मोठ्या रुबाबात चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली.

विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मग भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 191 धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 128 धावांच्या भागिदारीनं टीम इंडियाला विजयपथावर नेलं.

भारताकडून शिखर धवननं 78 धावांची, तर विराट कोहलीनं नाबाद 76 धावांची खेळी उभारली.

त्याआधी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरानं दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयानं भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म केलं असून, 15 जूनला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर होत असलेल्या उपांत्य सामन्यात  टीम इंडियाची गाठ बांगलादेशशी पडेल.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव 191 धावांत गुंडाळून खरोखरच कमाल केली. क्निन्टॉन डी कॉक आणि हाशिम अमलानं 76 धावांची सलामी दिली खरी, पण त्यासाठी त्यांना 105 चेंडू खर्ची घालण्याची वेळ आली. कारण भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकी सलामीवीरांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही.



त्यानंतर क्निन्टॉन डी कॉक आणि फॅफ ड्यू प्लेसीनं सात षटकांत 40 धावांची भागीदारी रचली. पण रवींद्र जाडेजानं डी कॉकचा त्रिफळा उडवला आणि तिथून दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे नऊ फलंदाज अवघ्या 76 धावांत माघारी परतले.

आफ्रिकेला त्यांचाच डोस

चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या अस्तित्त्वाच्या लढाईत टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवलेली चपळाई वाखाणण्याजोगी होती. भारतीय क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात तीन फलंदाजांना धावचीत करून, दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच औषधाचा डोस पाजला.

सर्वात आधी हार्दिक पांड्याने केलेल्या जबरदस्त थ्रोवर, धोनीने चपळाईने दांडी उडवून, आफ्रिकेचा खतरनाक फलंदाज डीव्हीलियर्सला धावबाद केलं.

त्यानंतर मग लगेचच डेव्हिड मिलर आणि फॅब ड्युप्लेसिस हे दोघेही एकाच बाजूला  आले. त्यावेळी बुमराहने टाकलेल्या थ्रोवर विराट कोहलीने सहज स्टम्प उखडून मिलरला धावबाद केलं.

यानंतर गोंधळलेल्या तळाचा फलंदाज इम्रान ताहीरलाही  विराट कोहलीच्या थ्रोवर धोनीने धावबाद करेलं आणि आफ्रिकेचा डाव 191 धावांत गुंडाळला.

https://twitter.com/ICC/status/874061188170104832

VIDEO:
https://www.icc-cricket.com/champions-trophy/video