विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल 6 शतकं ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी 55.74 इतकी आहे. कोणत्याही वन डे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे.
दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं.
चहलला आयसीसी टी ट्वेण्टी परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला. चहलने गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सन्मानित करण्यात येणार आहे. स्मिथला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला.
उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या हसन अलीने पटकावला. चॅम्पियन्स ट्रॉफीत हसन अलीने 13 विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.
अफगाणिस्तानच्या राशीद खानला असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान मिळाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा पाकिस्तानी संघ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
त्यामुळेच पाकिस्तानी संघाला फॅन्स मुमेंट ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला.
आयसीसी पुरस्कार 2017
- विराट कोहली (भारत) - सर्वोत्तम वन डे क्रिकेटर
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर
- यजुवेंद्र चहल (भारत) - टी ट्वेण्टीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरव
- हसन अली (पाकिस्तान) - उदयोन्मुख क्रिकेटर
- राशीद खान (अफगाणिस्तान) - असोसिएट प्लेअर ऑफ द इयर