इंग्लंडचं 351 धावांचं लक्ष्य पार करताना टीम इंडियाची अवस्था 4 बाद 63 अशी झाली होती. त्यावेळी केदार जाधव मैदानात आला. त्यावेळी आपल्याला 150 धावापर्यंत विकेट टिकवायची आहे. ते शक्य झाल्यास इंग्लंडचे खेळाडू आपोआप पॅनिक होतील, असं केदारला सांगितलं. मग केदारनेही उत्तम फलंदाजी करत, जोरदार फटकेबाजी केली, असं कोहलीने सांगितलं.
आपण 150 धावांचा टप्पा ओलांडल्यास, इंग्लंडचे खेळाडू चिंताग्रस्त होतील. खेळपट्टी उत्तम आहे, त्यामुळे तू तुझे फटके खेळशील, असंही विराटने केदारला सांगितलं.
मात्र केदारने खेळलेले काही फटके पाहून मी स्वत: अवाक् झालो. मी त्यावर विश्वासच ठेवू शकत नव्हतो. केदारसोबतची भागीदारी खूपच खास होती. त्यामुळे ती दीर्घकाळ लक्षात राहील, असंही कोहली म्हणाला.
केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली
विराट कोहलीनंही विजयाचं श्रेय केदार जाधवच्या खेळीलाच दिलं. कोहलीने 122 आणि केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूत 120 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने हा सामना 3 विकेट्स आणि 11 चेंडू राखून सहज जिंकला.
केदारकडे खूप क्षमता आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन गरजेच्यावेळी शतक ठोकणं हे खूपच खास आहे. केदारने त्याच्या कुटुंबासमोर, घरच्या मैदानात ठोकलेल्या शतकामुळेच टीम इंडिया विजयपथापर्यंत पोहोचली, असं कोहलीने नमूद केलं.
केदार जाधवच्या याच आश्वासक खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
संबंधित बातम्या