कोलकाता : टीम इंडियाच्या बहुतेक शिलेदारांना माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे हा खूपच कठोर शिस्तीचा वाटत असला तरी आपण त्यांच्याशी सहमत नसल्याचं भारताचा कसोटी यष्टिरक्षक रिद्धिमान साहानं स्पष्ट केलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल कुंबळे हा एक कठोर शिस्तीचा व्यक्ती आहे असा सर्वसाधारण समज झाला आहे, याकडे लक्ष वेधता आपल्याला तसं वाटत नसल्याचं साहानं सांगितलं.



रिद्धीमान साहा नेमकं काय म्हणाला?

'त्यांचं वागणं मला कठोर नव्हतं वाटत, कोच म्हणून कधी-कधी त्यांना कठोर व्हावं लागत होतं. पण काही जणांना वाटत होतं की ते कठोर आहेत. तर काही जणांना तसं अजिबात नव्हतं वाटत. अनिल भाई कठोर आहेत असं मला वाटत नाही .'

'अनिल भाईंना नेहमी वाटायचं की, आम्ही मोठा (400, 500 किंवा 600 धावा) स्कोअर करावा आणि प्रतिस्पर्धी संघाला 150 के 200 धावांच्या आत बाद करावं. पण ते नेहमी शक्य नसतं.' असं साहा हसत-हसत म्हणाला.

'तर रवी भाई हे नेहमीच आक्रमक असतात. ते सांगतात की, जा आणि प्रतिस्पर्धी संघाला झोडपून काढा. मला दोघांमध्ये फक्त तेवढाच फरक जाणवतो. पण दोघेही सकारात्मक आहेत.' असंही साहा म्हणाला.

श्रीलंका दौऱ्यावरुन परतल्यानंतर साहानं ही प्रतिक्रिया दिली. साहाची निवड फक्त कसोटी संघातच करण्यात आली होती.