पुणे: कर्णधार विराट कोहलीमुळेच मी इतकी चांगली खेळी करु शकलो, असं टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार केदार जाधवने सांगितलं.

इंग्लंडचं डोंगराएवढं 351 धावांचं लक्ष्य लिलया पेलल्यानंतर, टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने, मराठमोळ्या केदार जाधवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

त्यानंतर केदार जाधवनेही आपल्या खेळीचं राज उघडून सांगितलं. याशिवाय केदार जाधवने कर्णधार कोहलीचेही आभार मानले.

"मोठं लक्ष्य कसं पूर्ण करायचं, हे  कर्णधार कोहलीने यापूर्वी अनेकवेळा दाखवलं आहे. त्यामुळेच मला इंग्लंविरुद्धची खेळी करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी मी अनेक फलंदाजीच्या संधी गमावल्या होत्या. त्यातच विराटसोबतही फलंदाजी करणं आणि त्याची फलंदाजी जवळून पाहण्याची संधीही चुकली होती. पण या सामन्यानिमित्त ती संधी मिळाली, त्यामुळे हा माझ्यासाठी खास दिवस होता", असं केदार जाधवने नमूद केलं.

दुसरीकडे विराटसोबत धावणं हे मोठं आव्हन असल्याची कबुली केदारने दिली.

देशासाठी खेळल्याचा अभिमान

यावेळी केदार जाधव म्हणाला, "माझ्या घरच्या मैदानात, कुटुंबासमोर मी एक उत्तम खेळी करुन मी देशासाठी सामना जिंकला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या संघाला जिंकवता, देशाचा अभिमान वाढवता, तेव्हा ती खूपच मोठी बाब असते".

या सामन्यासाठी केदार जाधवचे आई-वडिल, पत्नी आणि मुलगीही आली होती. त्यांच्यासमोर केदार जाधवने शतक ठोकून त्यांना अनोखी मानवंदना दिली.

संबंधित बातम्या
केदारला सांगितलं होतं, तू फक्त 150 पर्यंत साथ दे : कोहली

केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली

केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी

भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग

पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

पुण्यात ‘विराट’ सेनेपुढे सायबांवर संक्रांत, टीम इंडियाचा धमा’केदार’ विजय