हैदराबाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथं द्विशतक ठोकून, बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीचा दुसरा दिवस गाजवला.


विराट कोहलीच्या या द्विशतकाला रिद्धिमान साहाचं शतक, तसंच अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकांचीही जोड लाभली. त्यामुळेच भारताला आपला पहिला डाव सहा बाद 687 धावसंख्येवर घोषित करता आला.

भारतीय डावाच्या उभारणीत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी रचून मोलाचा वाटा उचलला. मग रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजाने सातव्या विकेटसाठी 118 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली.

विराट कोहलीने 204 धावांची खेळी केली तर रिद्धिमान साहाने नाबाद 106 धावा फटकावल्या. अजिंक्य रहाणेने 82, तर रवींद्र जाडेजाने नाबाद 60 धावांची खेळी केली.

त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर एक बाद 41 धावांची मजल मारली. बांगलादेश भारतापेक्षा अजूनही 646 धावांनी पिछाडीवर आहे.