हैदराबाद: डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच धावांनी पराभव करून, आयपीएलच्या पाच सामन्यांमधला तिसरा विजय साजरा केला. या सामन्यात हैदराबादनं पंजाबला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं.
मनन व्होरानं 50 चेंडूंत 95 धावांची धडाकेबाज खेळी करून, पंजाबच्या विजयाचं समीकरण 12 चेंडूंत 16 धावांवर आणून ठेवलं होतं. पण पुढच्याच षटकात भुवनेश्वर कुमारनं केसी करिअप्पा आणि मनन व्होराला माघारी धाडून सामन्याला हैदराबादच्या बाजूनं कलाटणी दिली.
सिद्धार्थ कौलनं अखेरच्या षटकात ईशांत शर्माचा त्रिफळा उडवून हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारनं 19 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं.