दुबई : क्रिकेटप्रेमींसाठी आजचा रविवार सुपर सण्डे ठरणार आहे. कारण आशिया चषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना आज खेळवण्यात येणार आहे.
आजचा सामना एका दाम्पत्यासाठीही खास आहे. प्रेमाला जात, धर्म, भाषा, वय आणि सीमेचंही बंधन नसतं. हेच या दाम्पत्यावरुन दिसतं. या दाम्पत्यापैकी पती हा पाकिस्तानातील कराचीमधला आहेत तर पत्नी भारताची आर्थिक राजधानी मुंबईमधली आहे. दुबईत राहणाऱ्या या दाम्पत्याला कोणताही संघ जिंकला, तरी विजयाचा आनंद समानच असणार आहे.
कराचीमधील सज्जद हैदर आणि मुंबईतील बुशरा रिझव्ही यांचा 2010 मध्ये निकाह झाला. याचवर्षी पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हे देखील लग्नबंधनात अडकले होते. महत्त्वाचं म्हणजे सज्जद हा शोएब मलिकला जवळचा मित्र आहे. क्रिकेटच्या बॅट बनवण्याचा त्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे पत्नी भारतीय असल्याने आशिया चषकातील हा सामना भारताने जिंकला तरी वाईट वाटणार नाही, असं सज्जद हैदर सांगतो.
सज्जद आणि बुशरा दुबईतील आशिया चषकाच्या सुपर फोरच्या सामन्यासाठी स्टेडियमध्ये हजर राहणार आहेत. पण कोणत्याही विशिष्ट संघाला पाठिंबा देण्याचा त्यांचा इरादा नाही. भारत जिंको वा पाकिस्तान, आमच्यासाठी विजयाचा आनंद तेवढाच असेल, असं सज्जद आणि बुशरा यांनी सांगितलं.
फायनलचं तिकीटासाठी विजय गरजेचा
आशिया चषकाच्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला, तर पाकिस्तानही अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर पाकिस्तानला हरवावंच लागेल.
रोहित शर्माच्या टीम इंडियाने प्राथमिक साखळीत पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या निकषावर पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.