मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी मालिका खेळल्यानंतर टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी त्याचा संघ यॉर्कशायरच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आतापर्यंत काऊंटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलेल्या पुजाराचं पुनरागमन निराशाजनक झालं.


काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी तब्बल 8200 किमीचा प्रवास करून साउथम्प्टनला गेलेल्या चेतेश्वर पुजाराच्या पदरी निराशा पडली. सेमीफायनलमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळणाऱ्या पुजाराला अवघे चार चेंडूच खेळता आले.

काऊंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला या सामन्यात मात्र खातंही उघडता आलं नाही. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला पुजारा केवळ चार चेंडू खेळून माघारी परतला. पुजाराने ‘रॉयल लंडन’ चषकात एका शतकासह तीन अर्धशतके झळकावली आहेत.

या सामान्यात दक्षिण आफिक्रेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याला बाद केलं. ‘रॉयल लंडन’ चषकात हॅम्पशायर संघाकडून खेळणाऱ्या डेल स्टेनचे हे दीर्घ काळानंतरचं पुनरागमन आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पुजाराची निवड करण्यात आली आहे. भारतासाठी कसोटीमध्ये पुजारा तिसऱ्या क्रमांकावरील अत्यंत भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो.

पुजाराची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

आपल्या संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने भारतीय संघासाठी आतापर्यंत 57 सामन्यांत 50.51 च्या सरासरीने 4496 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 शतकांसह 17 अर्धशतकांचा समावेश आहेत.

पाहा व्हिडीओ :