नवी दिल्ली : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंह सीनियर यांचं निधन झालं आहे. बलबीर सिंह 95 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
फोर्टिस रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर अभिजीत सिंह यांनी सांगितले की, 'बलबीर सिंह यांनी सोमवारी सकाळी जवळपास 6 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.' बलबीर सिंह सीनियर यांच्या कुटुंबात त्यांची मुलगी सुशबीर आणि 3 मुलं कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर आहेत.
3 वेळा जिंकलं होतं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक
बलबीर सिंह स्वतंत्र भारतातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक समजले जातात. लागोपाठ 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात ते होते. 1956मध्ये मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये ते कर्णधार असताना भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यावेळी भारतीय संघाने एकूण 38 गोल केले होते. तर विरूद्ध संघाने एकही गोल केला नव्हता.
बलबीर सिंह यांचा जन्म 31 डिसेंबर 1923 रोजी पंजाबच्या हरिपूर खालसामध्ये झाला होता. त्यांचा फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील हॉकीच्या सर्वात महान खेळाडूंमध्ये समावेश होतो. बलबीर सिंह भारत स्वातंत्र झाल्यानंतर 1948मध्ये लंडनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या संघाचा भाग होते.
1948 वर्ल्ड कप फायनलमध्ये ब्रिटनच्या विरोधात भारतीय संघाने केलेल्या 4 गोल पैकी 2 गोल बलबीर यांनी केले होते. त्यानंतर बलबीर सिंह सीनिअर त्यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्स विरोधात 6-1 ने भारताने विजय मिळवला होता. त्या सामन्यात त्यांनी पाच गोल केले असून त्यांच्या नावावर अद्याप हा रेकॉर्ड आहे. 1975 च्या विश्वकप स्पर्धेत विजयी झालेल्या भारतीय हॉकी टीमचे ते मॅनेजर होते.
अभिनव ब्रिंदाने व्यक्त केलं दु:ख
भारताच्या दिग्गज हॉकीपटूंच्या निधनानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीमध्ये एकमेव सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या अभिनव बिंद्राने दुख: व्यक्त केलं आहे. अभिनवने बोलताना त्यांचा एक दिग्गज रोल मॉडेल म्हणून उल्लेख केला आहे. यासंदर्भात अभिनव बिंद्राने ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्याने लिहिलं आहे की, 'भारताचे दिग्गज हॉकीपटूंपैकी एक बलबीर सिंह सीनियर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे दुखी आहे. त्यांच्याप्रमाणे एथलीट आणि रोल मॉडेल फार कमी पाहायला मिळतात. माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे की, त्यांना जाणून घेण्याची संधी मला मिळाली. मला आशा आहे की, त्यांचं उदाहरण जगभरातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल.' दरम्यान, 2018 मध्ये रिलीज करण्यात आलेलाअक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' हा चित्रपट बलबीर सिंह सीनियर यांच्या जीवनावर आधारीत आहे. यामध्ये बलबीर सिंह यांची भूमिका सनी कौशलने साकारली होती.
संबंधित बातम्या :
दिग्गज फुटबॉलर चुन्नी गोस्वामी यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास
Coronavirus | IPL 2020 रद्द झाल्यास मोठं नुकसान, पाच मोठे फटके कोणते?
Olympic 2020 | ... तर ऑलिम्पिक रद्द होणार; टोकियो ऑलिम्पिक कमिटीचा इशारा