मुंबई : भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने विंडीजविरुद्धच्या सामन्यात विक्रमांचा पाऊसच पाडला. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवणारे विंडीजचे गोलंदाज दुसऱ्या सामन्यात पुरते निष्रभ ठरलेले दिसले. विशाखापट्टणममध्ये रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28 वं शतक साजरं केलं. त्यानं केलेली 159 धावांची खेळी ही यंदाच्या वर्षात वन डेतली सातवी शतकी खेळी ठरली. या कामगिरीसह त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्या दोघांनी अनुक्रमे 2000 आणि 2016 साली एकाच वर्षात सात शतकं ठोकली होती. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त नऊ शतकं ठोकण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 1998 साली सचिननं ही कामगिरी केली होती. यासह आणखी काही विक्रमाला रोहितने गवसणी घातली आहे.
विराटच्या पुढे गेला हिटमॅन रोहित
रोहितने या या सामन्यात झळकावलेल्या शतकासह त्याने विराट कोहलीला शतकांच्या शर्यतीत मागे टाकले. 2017 या वर्षाच्या सुरूवातीपासून ते डिसेंबर 2019 या कालावधीतील रोहितचे हे 18 वे शतक ठरले. भारताकडून या दोन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावे होता. त्याने 17 एकदिवसीय शतके झळकावली होती. पण वेस्ट इंडीजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने दमदार 18 वे शतक ठोकले.
धोनीचेही रेकॉर्ड मोडले
या खेळीदरम्यान रोहित शर्माने सुरुवाती संथ खेळी केली मात्र नंतर खेळपट्टीवर जम बसवत रोहितने तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करत धोनी आणि विराटला मागे टाकलं. वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानी पोहोचला आहे. विंडीजविरुद्ध वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत 28 षटकारांसह महेंद्रसिंह धोनी पहिल्या नंबरवर होता तर विराट कोहली 25 षटकारांसह दुसऱ्या स्थानी होता. आता रोहित 29 षटकारांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
गांगुली आणि जयसूर्याशी बरोबरी
रोहितने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं २८ वं शतक झळकावलं. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने लोकेश राहुलसोबत २२७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सौरव गांगुली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशी बरोबरी केली आहे. 2019 वर्षातलं रोहितचं वन-डे क्रिकेटमधलं हे सातवं शतक ठरलं आहे. याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याशी बरोबरी केली आहे.
सलग तिसऱ्या वर्षात सर्वाधिक षटकार
2019 - रोहित शर्मा (77)
2018 - रोहित शर्मा (74)
2017 - रोहित शर्मा (65)
2015 - एबी डिव्हीलियर्स (63)
विक्रमादित्य रोहित | 'हिटमॅन'ची गांगुली, जयसूर्याशी बरोबरी तर धोनी, विराटचे रेकॉर्ड मोडले
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
18 Dec 2019 07:17 PM (IST)
भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने विंडीजविरुद्धच्या सामन्यात विक्रमांचा पाऊसच पाडला. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवणारे विंडीजचे गोलंदाज दुसऱ्या सामन्यात रोहितच्या खेळीसमोर पुरते निष्रभ ठरलेले दिसले. या सामन्यात रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -